न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- देहू ते आळंदी या महत्त्वपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक यश साने यांच्यासह चिखलीतील ज्येष्ठ ग्रामस्थांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली.
यावेळी यश साने, अमृत सोनवणे, प्रदीप आहेर, निवृत्ती शेलार, विष्णू मोरे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब साने, मोहन ढोळ आणि राम मोरे उपस्थित होते.
देहू ते आळंदी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना होणारे फायदे, वाहतूक कोंडी कमी होणे, प्रवासाचा वेळ वाचणे तसेच देहू-आळंदी या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांमधील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मागणीबाबत निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन श्रावण हर्डीकर यांनी दिल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच मेट्रोची प्रत्यक्ष सफर करत प्रकल्पाच्या विविध बाबींची माहितीही जाणून घेतली.
















