- राष्ट्रवादीच्या योगेश बहलांचा आक्रमक पवित्रा..
- म्हणाले, ‘नियमांची पायमल्ली मान्य नाही, न्यायालयात जाणार’…
मा. अशोक लोखंडे : संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला. शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. या सभेतील निर्णयांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही बहल यांनी दिला.
योगेश बहल म्हणाले, “लोकांच्या हिताच्या विषयांमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, जिथे नियमांची पायमल्ली होत आहे, तिथे आम्ही पाठिंबा देणार नाही. प्रत्येक गोष्टीला काही अधिकार आणि नियम आहेत. अधिसूचनेनुसार सभेसाठी सात दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. २७ ऑगस्टला अजेंडा काढण्यात आला, तो २८ ऑगस्टला वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आणि वर्तमानपत्रातही २८ ऑगस्टलाच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत सात दिवस पूर्ण झालेले नाहीत. आज केवळ सहा दिवस झाले असून, त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर आहे.”
“अजेंड्यावरील सर्व विषय १७ सप्टेंबरच्या नियमित सभेत घेणे अपेक्षित होते. ते विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही सभा शुक्रवारी का घेण्यात आली नाही? आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नियमित सभेत केवळ तीन विषय घ्यावेत. प्रशासनाने दिलेला खुलासा अयोग्य असून, वाचता एक आणि करता एक, अशी परिस्थिती आहे. १७ सप्टेंबरपर्यंत थांबा; मात्र चुकीच्या गोष्टीला आमचा पाठिंबा नाही,” असेही बहल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, “आमचा सभा उधळण्याचा कोणताही डाव नाही. मात्र, नियमांचे पालन झाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने नियमांनुसार काम करणे अपेक्षित आहे.”
शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनीही सभेच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला. “ही सभा अधिकृत असेल, तर आमचा पाठिंबा आहे. शहरातील विकासकामांचे निर्णय महत्त्वाचे आहेत. मात्र, ही प्रक्रिया नियमात बसत नसेल, तर आमचा पाठिंबा राहणार नाही,” असे बारणे यांनी स्पष्ट केले.
यावर स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समितीच्या विषयांबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, “स्थायी समितीचे विषय नजीकच्या सभेत घेता येतात. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.”
भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी मात्र ही सभा पूर्णपणे वैध असल्याचा दावा केला. “एमआरटी अधिनियमातील कलम ३५ नुसार ही सभा अधिकृत आहे. कलम ४४ नुसार सदस्यांना आक्षेप नोंदविण्याचा अधिकार आहे. ज्याला करायची त्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी; मात्र विषयांवर हरकत घेऊन विकासकामांना अडथळा आणू नये. अधिनियमातील सर्व तरतुदींमध्ये आजचे विषय बसतात. या संदर्भात उच्च न्यायालयाचा दाखलाही आहे. त्यामुळे सभा वैध आहे,” असे नढे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनानेही सभेच्या वैधतेबाबत स्पष्टीकरण दिले. महापालिका अधिनियमात तातडीची सभा घेण्याची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नियमित मासिक सभेतील विषयांसह २० ऑगस्टच्या सभेतील विषयांवर या विशेष सभेत निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे आजची सभा वैध असल्याची भूमिका प्रशासनाने मांडली.
दरम्यान, सभेच्या कायदेशीर वैधतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद झाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग करत न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविल्याने या सभेतील निर्णयांच्या वैधतेचा प्रश्न पुढील काळातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
















