- प्रकल्पाची संपूर्ण माहिती व सुरक्षिततेची खात्री झाल्याशिवाय मंजुरी देऊ नये; आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अप्पुघर अम्युजमेंट पार्क प्रकल्पाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून सुरक्षिततेची खात्री झाल्याशिवाय कोणतीही मुदतवाढ, मंजुरी किंवा कामाचे आदेश देऊ नयेत, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
काटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना काळात प्रकल्प बंद असल्याने बंद असलेल्या कालावधीची मुदतवाढ देण्याबाबत स्थायी समितीकडून शिफारस करण्यात आली होती. आता प्रकल्पात नवीन उपक्रम राबविण्यासाठी दीर्घ मुदतवाढ देण्याचा विचार होत असल्याचे समजते. मात्र, प्रस्तावित उपक्रम, नवीन खेळणी व साहसी उपक्रम, प्रकल्पाचे नियोजन, सल्लागार आणि सुरक्षिततेबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
प्रकल्पातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेची जबाबदारी, वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची गुणवत्ता, नोंदणीकृत कंपन्यांची उत्पादने, तसेच आवश्यक शासकीय व सुरक्षाविषयक परवानग्यांबाबत स्पष्ट धोरण असणे आवश्यक असल्याचे काटे यांनी नमूद केले. विशेष आर्किटेक्ट, डिझायनर आणि अम्युजमेंट पार्क क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांचा अधिकृत सल्ला घेतल्याशिवाय मंजुरी देऊ नये, अशीही त्यांची मागणी आहे.
त्यामुळे प्रकल्पाची अधिकृत व संपूर्ण माहिती मिळेपर्यंत अप्पुघरला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देऊ नये, असे शत्रुघ्न काटे यांनी पत्राद्वारे आयुक्तांना स्पष्ट केले आहे.


















