- १३ आरोग्य निरीक्षकांची नोकरी धोक्यात…
- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खातेनिहाय चौकशी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १३ आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या प्रमाणपत्राच्या शासकीय मान्यतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याची तयारी केली आहे.
आरोग्य निरीक्षक भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने संबंधित संस्थेसह अनेक संस्थांच्या मान्यतेबाबत न्यायालयात माहिती सादर केली. शासनाची मान्यता नसताना अभ्यासक्रम चालविण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला.
महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्याचे सांगितले असून, आदेशानुसार १३ आरोग्य निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तसेच अशा संस्थांच्या प्रमाणपत्रधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


















