- देहू-आळंदी तीर्थक्षेत्र मार्गावरील रखडलेल्या कामामुळे वाहनचालक हैराण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. २ सप्टेंबर २०२६) :- देहू-आळंदी या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गावर तळवडे येथे उभारण्यात येत असलेल्या अर्धवट स्वागत कमानीत मंगळवारी (दि. १) दुपारी कंटेनर अडकला. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होऊन काही तास मोठी वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अनेक वर्षांपासून कमानीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून रस्त्यावर लोखंडी सांगाडा उभा आहे. यामुळे वाहनचालकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाकण व तळवडे औद्योगिक वसाहतीतील कामगारांनाही याचा मोठा फटका बसला.
कामातील दिरंगाईबद्दल संबंधित ठेकेदारावर २०२५ पासून दररोज अडीच हजार रुपयांचा दंड आकारला जात असल्याची माहिती महापालिकेने दिली. विशिष्ट दगड व कुशल कारागिरांमुळे विलंब झाल्याचे सांगत, २६ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करून लोखंडी सांगाडा हटविण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.


















