- विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिक संघटनांचा पाठिंबा…
- वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर ग्रामस्थ प्रशासनाला धारेवर धरणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २ सप्टेंबर २०२६) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढत्या नागरी समस्यांविरोधात ६ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचाही पाठिंबा वाढत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार शंकर मांडेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेनेचे नागेश साखरे आणि वसंत साखरे, मारुंजीचे सरपंच कृष्णा बुचडे तसेच कपिल बुचडे यांनीही आंदोलनाला समर्थन दिले आहे. स्थानिक पातळीवरील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने विविध राजकीय पक्षांचा सहभाग वाढत आहे.
हिंजवडीसह माण, मारुंजी, म्हाळुंगे, सुस, बाणेर, बालेवाडी, वाकड, पुनावळे, ताथवडे आणि रावेत या परिसरांतील नागरी प्रश्न आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत. या भागात वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे वाहतूक आणि मूलभूत सुविधांवरील ताण वाढला आहे.
विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. खराब रस्ते, सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था, पाणीपुरवठा, पावसाळी नाल्यांची स्थिती आणि रखडलेले विकास प्रकल्प हे प्रश्न आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. विविध भागांतील नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.


















