न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल-दुरुस्ती, महापालिका रुग्णालयांतील आरोग्य सुविधा, संगणक यंत्रणेची सायबर सुरक्षा, नव्याने स्थापन झालेल्या क्षेत्रीय कार्यालयासाठी आवश्यक सुविधा, उद्यान विभागातील मनुष्यबळ तसेच विविध सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या संगणक यंत्रणेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी ३ हजार अँटी-व्हायरस प्रणाली खरेदी करण्यास तसेच पुढील तीन वर्षांसाठी एक सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांतील संगणकीय प्रणालींची सुरक्षा, देखभाल आणि तांत्रिक सहाय्य यामुळे अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या रस्ते आणि बीआरटीएस मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीसंदर्भात विविध कामांना मान्यता देण्यात आली. नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्यविषयक दुरुस्ती, तसेच कॉरिडॉर क्रमांक ३ नाशिक फाटा ते वाकड रस्त्याची देखभाल-दुरुस्ती व इतर अनुषंगिक स्थापत्य कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर औंध-रावेत बीआरटीएस रस्त्याचे मूल्यमापन करून बसथांबे आणि बीआरटी मार्गाच्या स्थापत्य सुविधांचे मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक कामांनाही मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या विद्यमान आठ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली असून, नव्याने कार्यान्वित झालेल्या ‘लोहगड’ ल क्षेत्रीय कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व स्थापत्यविषयक कामांना मान्यता देण्यात आली. या कार्यालयामध्ये प्रभाग समिती सभागृह, प्रभाग अध्यक्ष केबिन, क्षेत्रीय अधिकारी व लेखा विभागासाठी आवश्यक कक्ष, कॅश काउंटर, तसेच स्थापत्य व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसाठी कार्यालयीन व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. यामुळे नव्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र व नागरिकाभिमुख पद्धतीने करता येणार आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक विविध प्रकारचे Orthopedic Implants खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे योजनेंतर्गत पात्र रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया साहित्य वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कान, नाक व घसा विभागात वापरण्यात येणाऱ्या Debrider Otology Microdrill and Steps Drill System या वैद्यकीय उपकरणाचा हमी कालावधी पूर्ण झाल्याने पुढील एक वर्षासाठी त्याच्या सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्तीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे संबंधित अत्यावश्यक वैद्यकीय उपकरण कार्यक्षम स्थितीत ठेवता येणार आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन-संकलन व्यवस्था तसेच महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी आवश्यक मंडप व इतर अनुषंगिक व्यवस्था करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १ मधील महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठीही आवश्यक मंडप व्यवस्था करण्यास मंजुरी देण्यात आली.
मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरासाठी उच्चदाब विद्युतपुरवठा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, पुतळ्याभोवती आकर्षक एलईडी प्रकाश व्यवस्था आणि इतर विद्युतविषयक सुविधा प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक वीजजोडणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील प्लॉट क्रमांक १६, एमआयडीसी येथील रस्ते आधुनिक पद्धतीने विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी QCBS पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. तांत्रिक व आर्थिक मूल्यांकनाच्या आधारे पात्र सल्लागारामार्फत प्रकल्पाच्या निविदापूर्व व निविदोत्तर कामांचे नियोजन आणि देखरेख करण्यात येणार आहे.
उद्यान विभागातील मनुष्यबळाची कमतरता आणि सुरू असलेल्या कामांची निकड लक्षात घेऊन यापूर्वी काम केलेल्या पाच उद्यान अधिकारी आणि तीन सहाय्यक उद्यान अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर पुनर्नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील ३० डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण आणि दोन लाख देशी झाडांच्या लागवडीसह उद्यान विभागाच्या विविध कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.
महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ सात दिवस आयोजित करण्यास तसेच कार्यक्रमाच्या विस्तारित स्वरूपास मान्यता देण्यात आली. यामध्ये कलाकारांचे कार्यक्रम, व्याख्याने, कवी संमेलन, निवेदन तसेच फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, एलईडी स्क्रीन, पुस्तक खरेदी, भोजन व्यवस्था आणि विविध माध्यमांद्वारे कार्यक्रमाची प्रसिद्धी अशा बाबींचा समावेश राहणार आहे.
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विकासकामासोबत पाणीपुरवठा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. परिसरातील वाढती लोकसंख्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक व व्यापारी विकास आणि भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन पूर्वी प्रस्तावित जलवाहिन्यांसोबत अधिक क्षमतेच्या डी.आय. जलवाहिन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सुधारित कामास मान्यता देऊन संबंधित प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम व नियमित ठेवण्यासाठी विविध क्षेत्रांतील पाण्याच्या टाक्या, जलक्षेत्र आणि वितरण व्यवस्थांच्या परिचालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामांना एकत्रितपणे मान्यता देण्यात आली. यामध्ये बोपखेल पाण्याची टाकी व परिसरातील डी.आय. व एचडीपीई पाइपलाइन, पांजरपोळ व गुळवेमैदान टाकी परिसर, दिघी पाण्याची टाकी व परिसर, पिंपळे निलख व परिसर, ‘इ’ प्रभागातील प्रभाग क्रमांक ३०, थेरगाव टाकी व जलक्षेत्र, वाकड-भगवाननगर-काळाखडक टाकी व बायपास जलक्षेत्र, श्रीनगर टाकी व जलक्षेत्र, पिंपरीनगर व पिंपरी गावातील पाण्याच्या टाक्यांचे जलक्षेत्र, पाटीलनगर-चिखली जलकुंभ, जाधववाडी पाण्याच्या टाक्या व कुदळवाडी पंपिंग केंद्र यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध उंच पाण्याच्या टाक्यांवरून तसेच आनंदनगर, संभाजीनगर, मोहननगर आणि काळभोरनगर-आकुर्डी परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी आवश्यक मजूर कर्मचारी आणि महापालिकेच्या टँकरसाठी वाहनचालक उपलब्ध करून देणे तसेच पाणीपुरवठा विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयांमुळे विविध भागांतील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन, गळती-दुरुस्ती आणि नियमित देखभाल अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “शहरातील नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा मिळणे, रस्ते व बीआरटीएससारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सुस्थितीत राहणे आणि महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये आवश्यक उपकरणे व उपचार साहित्य वेळेत उपलब्ध होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्याचबरोबर महापालिकेची डिजिटल सुरक्षा मजबूत करणे, नव्या क्षेत्रीय कार्यालयांमधून नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देणे आणि शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून भविष्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. प्रशासकीय कार्यक्षमता, सेवांची गुणवत्ता आणि नागरिकहित या तीन बाबींना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती सातत्याने कार्यरत राहील.”

















