- मयत, स्थलांतरित व दुबार नोंदींची छाननी..
- ३,८४० मतदारांच्या कागदपत्रांची होणार तपासणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- देहू नगरपंचायत हद्दीतील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात मोठ्या प्रमाणावर नावे कमी झाली आहेत. छाननी प्रक्रियेत ५ हजार २३६ मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मतदारसंख्या २१ हजार २३९ वरून १६ हजार ३ इतकी झाली आहे.
वगळण्यात आलेल्या नावांमध्ये ५६३ मयत, ३ हजार ८४१ स्थलांतरित आणि ८२७ दुबार मतदारांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच काही अर्जांमध्ये स्वाक्षरी अथवा आवश्यक माहिती नसल्याचेही तपासणीत आढळले आहे.
दरम्यान, मतदारांच्या नोंदींमध्ये त्रुटी असलेल्या आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावयाच्या सुमारे ३ हजार ८४० मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असून, नाव किंवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















