- वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र व एसपीओंना मार्गदर्शन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी रावेत पोलीस ठाण्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एसपीओ (विशेष पोलीस अधिकारी) आणि पोलीस मित्रांना उत्सव काळातील सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
उत्सव काळात रावेत परिसरातील सार्वजनिक कार्यक्रम तसेच इस्कॉन मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाला सहकार्य करण्यासाठी समितीचे पोलीस मित्र आणि एसपीओ तैनात राहणार आहेत. गर्दीचे नियोजन, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे तसेच नागरिकांशी संयमाने व नम्रतेने वागण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांनी दिल्या. बैठकीस रावेत इस्कॉन श्रीकृष्ण मंदिराचे व्यवस्थापक जयप्रकाश भामरे प्रभुजी आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऋषीकेश गाजरे यांचा विशेष सन्मान…
या बैठकीचे औचित्य साधून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीमध्ये अनेक वर्षांपासून एसपीओ म्हणून अविरत सेवा देणारे आणि पोलीस प्रशासनाला नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे ऋषीकेश गाजरे यांचा ५०व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, जन्माष्टमीच्या निमित्ताने समितीचे ७५ एसपीओ रावेत परिसर तसेच इस्कॉन मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. उत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत समन्वयाने काम केले जाणार आहे.
बैठकीला समितीचे प्रमुख पदाधिकारी तसेच एसपीओ धीरज नारखेडे, ऋषीकेश गाजरे, किरण चौधरी, निखिल राणे, उज्वल राणे, तेजस पाटील, गौरी सरोदे, शिल्पा हेरलगी, रेणुका इलकल, कल्पना थोरात, विजया बनसोडे, स्वाती गोंटे, प्रणिता मतकर, साक्षी लोहार आणि अर्चना निंबाळकर उपस्थित होते.
एलआयबी पोलीस विभागाचे दयानंद देवकर, परशुराम शेलार, समितीचे विभागप्रमुख विशाल शेवाळे आणि संतोष चव्हाण यांनी बैठकीचे नियोजन केले. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहकार्यामुळे रावेत परिसरातील श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


















