- समावेशाचा संभाव्य निर्णय स्वागतार्ह, हिंजवडीला ‘नवा बेंचमार्क’ बनवणार : सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे..
- हिंजवडी-माण-मारूंजीच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समावेशाला सत्ताधारी अनुकूल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह परिसरातील नागरी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी हिंजवडी-माण-मारूंजीसह लगतच्या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, हिंजवडीचा विकास करण्याची क्षमता केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेत असून, या परिसराला ‘नवा बेंचमार्क’ बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शितोळे म्हणाले की, हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठी आपण सर्वप्रथम २०१३ साली प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. तसेच नगरविकास विभागाकडेही याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या विषयाबाबत विविध मतप्रवाह होते.
आता परिस्थिती बदलली असून, हिंजवडी-माण-मारूंजीच्या महापालिका समावेशाबाबतचा मतप्रवाहही बदलला आहे. हिंजवडीचा विकास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच प्रभावीपणे करू शकते, असे शितोळे यांनी स्पष्ट केले.
हिंजवडी परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि अन्य नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आयटी पार्कमुळे या परिसराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व वाढले असतानाही अपेक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांसह आयटी कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल 35 ते 37 आयटी कंपन्यानी आपले बस्तान अन्य ठिकाणी हलवले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हा मुद्दा फारच गांभीर्यपूर्वक घेतला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडीसह लगतच्या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याचे संकेत दिल्याने या चर्चेला नवे बळ मिळाले आहे. त्यामुळे हिंजवडीच्या महापालिका समावेशाचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता असून, आगामी निर्णयाकडे नागरिक, उद्योजक आणि आयटी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
हिंजवडीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या परिसराचा नियोजनबद्ध विकास केला जाईल. हिंजवडीला विकासाचा नवा बेंचमार्क बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कचऱ्याची समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करून हिंजवडीला अधिक सुटसुटीत, नियोजनबद्ध आणि आधुनिक परिसर बनवण्यासाठी महापालिका सक्षम आहे,”
– प्रशांत शितोळे, सभागृह नेते, पिंपरी-चिंचवड महापालिका…

















