- ससूनच्या तज्ज्ञ समितीच्या अभिप्रायानंतर सांगवी पोलिसांची कारवाई…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- पिंपळे गुरव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीने उपचारादरम्यान प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचा अभिप्राय दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बबन शिवराम कातखडे (वय ६०, रा. मोशी) यांच्यावर पिंपळे गुरव येथील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपचार व शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी निर्मला कातखडे यांनी केला आहे.
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी वैद्यकीय चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे ससून रुग्णालयाकडे पाठविली होती. तज्ज्ञ समितीने २५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या अभिप्रायात उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचे नमूद केले आहे.
त्यानंतर उपचार करणारे डॉक्टर मधू काशीराव पठाण आणि भूलतज्ज्ञ डॉक्टर अभिषेक विद्याधर लोणीकर यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढगे करीत आहेत.


















