न्युज पीसीएमसी नेटवर्क
किवळे (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- किवळे येथील के टाऊन इमारतीजवळ एका तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी चारचाकीमधून लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या दिशेने धाव घेतल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पियुष अनिल चव्हाण (वय २४, रा. के टाऊन, किवळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास के टाऊन इमारतीखालील ओ बेक कॅफेजवळ हा प्रकार घडला.
फिर्यादीला आरोपींनी फोन करून भेटण्यासाठी खाली बोलावले होते. पियुष खाली आल्यानंतर आरोपींनी कोणतीही चर्चा न करता त्याच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला. त्याच्या पाठ आणि मानेवर मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने कारमधून लोखंडी कोयता काढून फिर्यादीला मारण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक तसेच फिर्यादीचे आई-वडील व आत्या घटनास्थळी आले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यासोबतही धक्काबुक्की करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
इशान विक्रम डे, सिद्धांत राजू लटांबळे, शुभम गणेश प्रेमल आणि राहुल राघवराम चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलिस ठाण्यात विविध कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.


















