- कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले अर्भक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रालगत एका अज्ञात बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जन्म किंवा मृत्यूची माहिती लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह कपड्यात गुंडाळून तेथे टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. पीसीएमटी बसथांब्याजवळील स्मशानभूमीलगत असलेल्या इंद्रायणी नदीपात्राच्या काठावर कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत बालिकेचा मृतदेह आढळून आला. मृत बालिका जन्मानंतर अंदाजे एक ते दोन महिन्यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अज्ञात आई-वडील अथवा पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच मृतदेह येथे कोणी आणि कोणत्या परिस्थितीत आणून टाकला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.


















