न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पवना धरण हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. यंदा धरण पूर्ण भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संवर्धन, नदीपात्र स्वच्छता आणि जलप्रदूषण रोखण्याचा संदेश देण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, जलसंपदा विभागाचे रजनीश भारिया, पत्रकार, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















