- बैठकीचं पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच नाही..
- हा लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा व पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान – सभापती कैलास कुटे..
- सभापतींसह तानाजी बारणे, योगेश लांडगे, जितेंद्र ननावरे यांच्याकडून प्रशासनाचा निषेध…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या नियोजन बैठकीस प्रशासनाकडून क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप करीत समितीचे सभापती कैलास गणपत कुटे यांच्यासह नगरसेवक तथा समिती सदस्य तानाजी बारणे, योगेश लांडगे आणि जितेंद्र ननावरे यांच्यासह समिती सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत बोलताना समितीचे सभापती कैलास कुटे म्हणाले,
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाचे नियोजन करताना क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विषयांशी संबंधित अधिकृत समितीला विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, संबंधित समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांना नियोजन बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा व पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान झाला आहे.
सांस्कृतिक महोत्सव हा नागरिकांच्या सहभागाचा आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा विषय असल्याने त्याच्या नियोजनात पारदर्शकता राखणे, लोकप्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित करणे आणि सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीला डावलून घेण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवाच्या नियोजन बैठकीत प्रशासनाने संबंधित विषयाची जबाबदारी असलेल्या समितीलाच नियोजन बैठकीतून वगळल्याने समिती सदस्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहोत. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन भविष्यातील नियोजन प्रक्रियेत संबंधित समितीला विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा सभापती कैलास कुटे यांनी व्यक्त केली आहे.


















