- आणे गावातील ३८ वर्षीय संदीप शिंदे यांचा मृत्यू..
- चार दिवसांपासून होते बेपत्ता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
वडगाव आनंद (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- जुन्नर तालुक्यातील आणे येथील ३८ वर्षीय शेतकरी संदीप सुदाम शिंदे यांचा आबाटेक परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ३१ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या शिंदे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप शिंदे हे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी टोमॅटो विक्रीचे पैसे घेण्यासाठी दुचाकीवरून नारायणगाव येथे गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वडिलांशी त्यांचे शेवटचे फोनवर संभाषण झाले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते घरी परतले नाहीत.
दरम्यान, १ सप्टेंबर रोजी आळे-बोरी मार्गावरील बोरी बुद्रुक हद्दीत त्यांची दुचाकी, मोबाईल, पाकीट आणि चावी आढळून आली होती. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. नातेवाईकांनी परिसरासह कालव्याजवळ त्यांचा शोध घेतला होता. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आबाटेक जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना एका झाडाला व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेहाची ओळख संदीप शिंदे अशी पटवली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


















