न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- श्री गणेशोत्सव २०२५ दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी न्यायालयाने पिंपळे निलख येथील जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष बजरंग विनायक लकडे यांना एक हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव काळात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध करणारे आदेश लागू करण्यात आले होते. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांची बैठक घेऊन या आदेशाचे पालन करण्याच्या तोंडी व लेखी सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री गणेश नगर चौक ते पिंपळे निलख मेन बसस्टॉप दरम्यान काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात सबळ पुरावे मिळाल्यानंतर आरोपी बजरंग लकडे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालयाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना एक हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.
आगामी गणेशोत्सव २०२६ आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणत्याही मंडळाने प्रखर बीम लाईट, लेझर बीम लाईट किंवा नागरिकांच्या डोळ्यांना व आरोग्यास त्रासदायक प्रकाशयंत्रणेचा वापर करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित प्रकाशयंत्रणा जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त परिमंडळ १ संदीप आटोळे यांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे व सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व सांगवी पोलिसांच्या पथकाने केली.


















