न्युज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी भांडण करून तिच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बावधन येथील तोडकर वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पती परशुराम भागप्पा हरिजन (वय ४८) याच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते ३ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अॅम्ब्रोशिया हॉटेल शेजारी, विजय मल्यान यांच्या भाड्याच्या खोलीत घडली. मृत महिलेचे नाव निलाबाई असे आहे.
याबाबत सुरेश परशुराम हरिजन (वय २४, रा. तोडकर वस्ती, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीची आई निलाबाई आणि वडील परशुराम हे घरात झोपलेले असताना आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून निलाबाई यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या गळ्यावर कोणत्यातरी हत्याराने अथवा धारदार वस्तूने वार करून त्यांची हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटना घडल्यानंतर आरोपी परशुराम हरिजन हा फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस आरोपीचा शोध घेत असून, पोलीस उपनिरीक्षक गिरी पुढील तपास करीत आहेत.


















