- एच. एम. रियलिटीच्या चार जणांविरोधात काळेवाडी पोलिसांत गुन्हा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ सप्टेंबर २०२६) :- दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका विद्यार्थ्याच्या पालकाची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एच. एम. रियलिटी कार्यालयाशी संबंधित चार जणांविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमित धरमचंद जैन (वय ४५, रा. रॉयल ऑरेंज काऊंटी सोसायटी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ जून ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादी यांच्या घरी तसेच वाकड येथील भूमकर चौकातील वन व्हिजन मॉलमधील एच. एम. रियलिटी कार्यालयात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादींच्या मुलाला दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. त्यासाठी सिद्धार्थ, विव्हान, वेदिका आणि तन्मय या चार जणांनी फिर्यादींकडून ऑनलाइन स्वरूपात तीन लाख रुपये व रोख स्वरूपात सात लाख रुपये, अशी एकूण दहा लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
मात्र, पैसे घेतल्यानंतरही फिर्यादींच्या मुलाला दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून देण्यात आला नाही. तसेच फिर्यादींकडून घेतलेली दहा लाख रुपयांची रक्कमही परत न करता आरोपींनी तिचा अपहार करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नलावडे पुढील तपास करीत आहेत.

















