- महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सोसायट्यांतील वाद थेट पोलिस ठाण्यात..
- चऱ्होलीत सोसायटीतील जेष्ठाला कुत्र्याचा चावा; अनं मग ऱ्हाडा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ सप्टेंबर २०२६) :- शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील रस्ते, चौक आणि सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, महापालिका कार्यालयाच्या आवारातही कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानाही प्रशासनाकडून प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय होत नसल्यामुळे नागरिकांची नाराजी वाढली आहे.
महापालिका सभांमध्येही भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांकडून प्रशासनाला वारंवार धारेवर धरले जात आहे. कुत्र्यांची वाढती संख्या, नागरिकांवर होणारे हल्ले, नसबंदी आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित बदल होताना दिसत नाही. या प्रश्नाचे आता वेगळे आणि गंभीर स्वरूप समोर येऊ लागले आहे. भटक्या किंवा पाळीव कुत्र्यांवरून सोसायट्यांमध्ये रहिवासी आणि कुत्रे पाळणारे नागरिक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. हे वाद आता सोसायटीच्या बैठका किंवा तक्रारींपुरते मर्यादित न राहता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागले आहेत.
चऱ्होलीत सोसायटीतील जेष्ठाला कुत्र्याचा चावा..
चऱ्होलीतील Genesis Society मध्ये कुत्र्याच्या मुद्द्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. पोलिस नोंदीनुसार, सोसायटीतील कुत्र्यांबाबत योग्य खबरदारी न घेतल्याने ६७ वर्षीय रहिवाशाला कुत्र्याने चावा घेतला. या प्रकरणी ७० वर्षीय रहिवाशाने तक्रार दिल्यानंतर दिघी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुत्र्यांच्या प्रश्नाकडे केवळ प्राणीप्रेम किंवा नागरिकांची भीती या दोन बाजूंनी पाहून चालणार नाही. नागरिकांची सुरक्षितता, सोसायट्यांमधील वाढते वाद आणि आता पोलिसांपर्यंत पोहोचणारी प्रकरणे यामुळे हा प्रश्न कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे. महापालिका सभेत गदारोळ होतो, अधिकारी आश्वासने देतात; मात्र रस्त्यावरची आणि सोसायट्यांमधील परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन नेमका कोणता ठोस आणि शाश्वत तोडगा काढणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

















