- राजवाडेनगर परिसरातील बांधकाम जमीनदोस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काळेवाडी येथील राजवाडेनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिका प्रशासनाने आज (७ सप्टेंबर) धडक कारवाई केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४७०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी शहर अभियंता, सहशहर अभियंता, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, ‘ब’, ‘क’, ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी, बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
या कारवाईमध्ये महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे १० कार्यकारी अभियंता, २८ उपअभियंता, ६४ कनिष्ठ अभियंता आणि १६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारीही कारवाईसाठी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जवळपास ७५ एसआरपीएफ जवानांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.
अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी १ पोकलेन, ५ जेसीबी आणि २५ मजुरांची मदत घेण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी २ अग्निशमन वाहने आणि १ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.
महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असून, बांधकाम परवानगी न घेता किंवा नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या बांधकामांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


















