- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांमध्ये चिंता..
- ध्वनी मर्यादा पाळून वादन करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सव जवळ येत असताना शहरातील ११० हून अधिक ढोल-ताशा पथके सरावात व्यस्त आहेत. मात्र, डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधातील चर्चेमध्ये आता ढोल-ताशा वादनालाही विरोध होईल का, अशी चिंता काही पथकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही ढोल-ताशा वादकांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ढोल-ताशा वादनाबाबत कायदेशीर आणि सांस्कृतिक भूमिका स्पष्ट केली.
“आत्मा रणवाद्याचा, परंतु स्वरूप आणि कार्य सांस्कृतिक आहे. कायदा ढोल-ताशा या संस्कृतीला विरोध करत नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या अति-तीव्र आवाजाला मर्यादित करू इच्छितो,” असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
पूर्वी रणांगणावर सैन्याला प्रेरणा देण्यासाठी आणि शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी ही वाद्ये काळानुरूप उत्सव, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे माध्यम बनली आहेत. आजची तरुण पिढी ढोल-ताशाच्या माध्यमातून इतिहास, परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये आणि ढोल वाजवण्यास न्यायालयांनी सरसकट बंदी घातलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आवाज नियंत्रित करण्यासाठी अनेक ढोल-ताशा पथके ढोलाच्या आत ज्यूटच्या गोण्या किंवा नायलॉन पॅडिंगचा वापर करत आहेत. त्यामुळे वादनाचा पारंपरिक नाद कायम ठेवत ध्वनीची तीव्रता नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
“ध्वनी मर्यादा पाळून ढोल-ताशाच्या निनादाचा आनंद घ्या; सध्याच्या ध्वनीविषयक चर्चेची उगाच चिंता करू नका,” असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.


















