- सेल्स एक्झिक्युटिव्हविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटोमोबाईल्सच्या ग्राहकांकडून वाहन बुकिंगसाठी घेतलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या खात्यावर वळविल्याप्रकरणी सेल्स एक्झिक्युटिव्हविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ५५ वर्षीय महिला सेल्स मॅनेजर यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर सुधाकर बागडे (वय ४२, रा. संगमवाडी, शिवाजीनगर, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत आरोपी ऑटोमोबाईल्सच्या किवळे येथील आउटलेटमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. या कालावधीत त्याने ग्राहकांकडून वाहन बुकिंगच्या नावाखाली धनादेश तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण २ लाखांपेक्षा अधिक रक्कम घेतली.
मात्र, ग्राहकांकडून प्राप्त झालेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता आरोपीने ती स्वतःच्या बँक खात्यात वळविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची तसेच ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















