- कृष्णा जनरल हॉस्पिटलमधील उपचारांवर नातेवाईकांचे गंभीर आरोप..
- नातेवाईकांनी घेतली महापौर रवि लांडगे यांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- भोसरी येथील कृष्णा जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना १६ वर्षीय दिपाली संतोष ईरछे हिचा मृत्यू झाल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दिपालीच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर रवि लांडगे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणा व उपचारातील त्रुटींमुळे दिपालीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचारासाठी सुमारे दहा दिवसांपूर्वीचा जुना वैद्यकीय अहवाल वापरण्यात आला तसेच आवश्यक सोनोग्राफी करण्यात आली नाही, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.
दिपालीच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांना पुरेशी माहिती देण्यात आली नाही, तसेच गंभीर प्रकृतीनंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय शरीराला न चालणारे इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करून फॉरेन्सिक वैद्यकीय अहवाल प्राप्त होईपर्यंत हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत नियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपचाराशी संबंधित केस पेपर, वैद्यकीय अहवाल, औषधे व इंजेक्शनची नोंद, ऑपरेशन रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, निवेदनातील आरोपांची अधिकृत वैद्यकीय पुष्टी अद्याप झालेली नाही.

















