- समाज विकास विभागाच्या योजनांच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेचा शुभारंभ महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. महिला, बालके, दिव्यांग, मागासवर्गीय तसेच गरजू व वंचित घटकांतील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रिया नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऑनलाईन अर्जासोबत आवश्यकतेनुसार ऑफलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना अर्ज प्रक्रियेत आवश्यक सहाय्य देण्यावर भर देण्यात आला आहे. माहितीच्या अभावामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सभापती राणी पठारे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


















