- अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पद राखीव..
- विशेष सभेत अध्यक्षपदासाठी निवडणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- देहू नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. नगरपंचायत सभागृहात दुपारी १.३० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, हवेली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. हे पद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अर्जांची छाननी होईल. छाननीत बाद झालेल्या अर्जांची यादी त्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अर्जांवर आक्षेप किंवा अपील दाखल करण्यासाठी शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत आहे. दुपारी १२.३० वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत म्हणजे दुपारी १.३० वाजता विशेष सभेत अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


















