- आर्थिक अडचणींमुळे घेतले होते टोकाचे पाऊल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ सप्टेंबर २०२६) :- आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने दीड वर्षांच्या चिमुकलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचे कारण देत आई-वडिलांनी तिला देहूजवळील भंडारा डोंगरावर एकटी सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, आपलीच मुलगी असल्याचे सुरुवातीला लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाणे, तळेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार, ६ सप्टेंबर रोजी दाम्पत्याने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला भंडारा डोंगरावर नेले. आर्थिक अडचणींमुळे तिचे संगोपन करणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी चिमुकलीला तेथेच सोडले आणि तेथून निघून गेले. काही वेळाने डोंगरावर एकटी असलेली मुलगी नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी नेले.
मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तपासणीत ती साधारण दीड वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या शरीरावर कोणतीही दुखापत किंवा ओरखडा आढळला नाही. वय लहान असल्याने तिच्याकडून पालकांविषयी माहिती मिळविणेही शक्य झाले नाही.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुलीचे आई-वडील स्वतः पोलिस ठाण्यात पोहोचले. सुरुवातीला त्यांनी मुलगी आपल्याला मुंबईत सापडली होती आणि तिचे पालक नसल्याने आपण तिचा सांभाळ करीत असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर दोघांनीही ती आपलीच मुलगी असल्याची कबुली दिली.
आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नव्हते. डोंगरावर एखाद्या चांगल्या व्यक्तीचे लक्ष तिच्याकडे जाईल आणि ती तिचा सांभाळ करेल, या अपेक्षेने मुलीला तेथे सोडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
मात्र, मुलीला एकटे सोडल्यानंतर आपल्या कृत्याची जाणीव झाल्याने दुसऱ्याच दिवशी दोघेही पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.


















