- बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर झाल्याने मेहुण्यावर जीवघेणा हल्ला..
- पिस्तूल, कोयत्याचा वापर; झटापटीत पिस्तूल खाली पडल्याने बचाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. ०९ सप्टेंबर २०२६) :- बहिणीने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून तिच्या पतीला संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळे निलख परिसरात घडली. मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात पिस्तूल आणि कोयत्याचा वापर करण्यात आला. झटापटीदरम्यान पिस्तूल खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत तिघे जखमी झाले असून सांगवी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अमोल वीर हे या हल्ल्यातील मुख्य जखमी असून अनिकेत वीर आणि दीपक वीर यांनाही दुखापत झाली आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहन लांडगे आणि संदीप लांडगे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अमोल वीर आणि लांडगे कुटुंबातील तरुणांची मैत्री असून दोघांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी अमोल यांनी लांडगे यांच्या बहिणीसोबत कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मंगळवारी अमोल पिंपळे निलख परिसरात असताना रोहन आणि संदीप यांनी त्यांना गाठले. दोघांनी त्यांच्यावर पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत पिस्तूल खाली पडले. त्यामुळे अमोल यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र, या झटापटीत अमोल यांच्यासह अनिकेत आणि दीपक हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
प्रेमविवाहाच्या कारणातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.
– मनीषा कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड


















