- दोन्ही कंपन्यांवर अन्न व औषध विभागाकडून धाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १८ ऑक्टोबर २०२६) :- चाकण परिसरात कालबाह्य, खराब तसेच दूषित अन्नपदार्थांच्या हाताळणीतील गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत अंबेठाण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या वितरण केंद्रासह निघोजे येथील मेब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप आहे.
पहिल्या प्रकरणात उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६ नुसार रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या अंबेठाण येथील वितरण केंद्राशी संबंधित पियुष व्यास, राकेश कुमार आणि यासीन फूड सेंटरचे मालक यासीन सन्ना शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त कार्यालयातील अधिकारी सतीश सुभाषराव हाके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संबंधितांनी संगनमत करून कालबाह्य, खराब आणि उंदरांनी दूषित झालेला माल प्रत्यक्ष नष्ट न करता त्याची विल्हेवाट लावल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दुसऱ्या प्रकरणात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५३/२०२६ नुसार मेब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, गट क्रमांक ४१५, मौजे निघोजे येथील आस्थापनाशी संबंधित चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जसप्रीत सिंघ, भरत बाळ पाटील, इम्रान सलीम खान आणि तिरथलाल मनोजकुमार सरोज यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अभिजित अशोक झोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित आस्थापनाच्या तपासणीदरम्यान मुदतबाह्य, नाकारलेली, खराब झालेली तसेच पॅकेजिंगचे नुकसान झालेली अन्न उत्पादने पुन्हा विक्रीसाठी अन्नपुरवठा साखळीत अनधिकृतपणे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची दिशाभूल करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, दूषित किंवा घातक अन्नाशी संबंधित तरतुदी, गुन्हेगारी कट आणि आदेशाच्या अवज्ञेशी संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांमुळे अन्नपदार्थांची साठवणूक, विल्हेवाट आणि पुनर्विक्री प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.


















