- तरुणाची लाखोंची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १८ ऑक्टोबर २०२६) :-
पुणे शहर पोलीस दलात चालक म्हणून भरती करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी शशिकांत व्यंकटराव सूर्यवंशी (रा. मारुंजी, मूळ रा.जि. लातूर) याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अतिश दत्तात्रय गायकवाड (वय ३१, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादीला पुणे शहर पोलीस दलात चालक म्हणून भरती करून देण्याचे आश्वासन दिले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने वेळोवेळी पैसे घेतले. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ५० हजार रुपये, १९ नोव्हेंबर रोजी ५० हजार रुपये, ८ डिसेंबर रोजी २० हजार रुपये आणि २ मे २०२६ रोजी ५१ हजार रुपये फिर्यादीकडून घेतले.
तसेच फिर्यादीचे मेहुणे राहुल सूर्यवंशी यांच्या फोन-पे खात्यावरून आरोपीच्या फोन-पे क्रमांकावर ९९ हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आले. याशिवाय ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशा प्रकारे एकूण चार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मेहुण्याच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.

















