- मोशीतील पेट्रोल पंपावर गुंडगिर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १९ ऑक्टोबर २०२६) :- इंजिन ऑईलवर डिस्काउंट दिला नाही, या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्याच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी रेवन राजाराम पांढरे (वय ३३) हे वाघजाई पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चार जण पेट्रोल पंपावर आले. त्यापैकी दोघांनी इंजिन ऑईलची किंमत विचारली. कर्मचाऱ्याने मॅक कंपनीच्या एक लिटर ऑईलची किंमत ३६९ रुपये असल्याचे सांगितले.
सुरुवातीला ऑईल महाग असल्याचे सांगून निघून गेलेले दोघे काही वेळाने पुन्हा आले आणि त्यांनी एक लिटर ऑईल खरेदी केले. त्यांनी डिस्काउंटची मागणी केली; मात्र डिस्काउंट मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी यूपीआयद्वारे ३६९ रुपये ऑनलाइन भरले.
डिस्काउंट न मिळाल्याचा राग मनात धरून आरोपी देवानंद ऊर्फ देवा जमादार याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच, ‘मला ओळखत नाही का? मी तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी देत कमरेला लावलेले पिस्तूल काढून कर्मचाऱ्याच्या दिशेने रोखले. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर दहशत निर्माण झाली. परिसरात उपस्थित असलेले ग्राहकही घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपी स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देवानंद ऊर्फ देवा जमादार, सुलतान इसुफ खान, विलास धाऊ ढेबे आणि काशिनाथ कल्याण काळे या चौघांना अटक केली आहे. पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.


















