- चार अनोळखी तरुणांनी गाडीतून बाहेर ओढून केली मारहाण; डोक्याला गंभीर दुखापत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १९ ऑक्टोबर २०२६) :- गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चार अनोळखी तरुणांनी एमसीए सेकंड इयर च्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यावेळी एका तरुणाने जड वस्तूने विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नूतन इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी श्रेयस बजरंग पवार (वय २२, रा. पिंपळे गुरव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस पवार हे नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एमसीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. १७ ऑक्टोबर रोजी रात्री कॉलेजमधून स्वतःच्या चारचाकी गाडीने घरी जात असताना कॉलेजसमोरील रस्त्यावर काही तरुणांचा घोळका उभा होता. त्यांना बाजूला होण्यासाठी पवार यांनी गाडीचा हॉर्न वाजवला.
याचा राग आल्याने सुरुवातीला दोन तरुण पवार यांच्याजवळ आले. ‘आम्ही गाववाले आहोत, आम्हाला हॉर्न देतो का?’ असे म्हणत त्यांनी पवार यांना गाडीतून बाहेर ओढले. त्यानंतर आणखी दोन तरुण तेथे आले. या चौघांनी मिळून पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका तरुणाने जड वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
या घटनेप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ करीत आहेत.

















