- आप युवा आघाडीचा आक्रमक पवित्रा..
- दोषी बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारी झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहर आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात आले. जुन्या वृक्षांची कत्तल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास होत असलेली दिरंगाई याबाबत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला. तसेच, दोषी बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
महापालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची संख्या आणि वय कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अहवालात फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी..
कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी सुखवानी असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकासह संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आप युवा आघाडीने केली. दिशाभूल करून मिळविल्याचा आरोप असलेली बांधकाम परवानगी रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली.
तसेच, नियमानुसार १,०१८ झाडे लावण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने प्रति वृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना वाचवू नका : रविराज काळे…
शहराचा पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या जुन्या वृक्षांची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी उपस्थित केला. त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
वृक्षतोडीच्या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न निर्माण होतो, असे काळे यांनी म्हटले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. बांधकाम व्यावसायिक कितीही मोठा असला, तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून पर्यावरणाची हानी केली असेल, तर संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार…
महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणून दिल्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप आप युवा आघाडीने केला. प्रश्न केवळ काही वृक्षांच्या कत्तलीचा नसून शहराच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या उत्तरदायित्वाचाही आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आप युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे सचिव अभिजीत मोरे, समन्वयक अमित मस्के, कामगार आघाडी संघटक संजय कोणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, पुणे शहराध्यक्ष धनंजय बनकर, युवक शहराध्यक्ष विकी पासोटे, सुरेश गायकवाड, अंकुश लांडगे, यशवंत कांबळे, लक्ष्मण माने, सुप्रिया गायकवाड, अजय सिंग, शुभम यादव, सुरेश बावनकर, सुभाष कारंडे, कुणाल गोरडे, राहुल मुदनोर, राहुल मदने, सुनिता काळे, कविता कोंडे, गौतम अडसूळ, अंकुश डोंगरे, गौतम तायडे, अखिल शेख, अंगद मुद्दे आणि सुरज झिटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


















