- निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खराबवाडी (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- खेड तालुक्यातील खराबवाडी गावच्या हद्दीत नवीन मदरसन कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी रोलरच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी रोलर चालक भीमराव यशवंत वैद्य (वय ३३, रा. आंबेगाव, मूळ रा. हिंगोली) याच्याविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोलर चालक हा त्याच्या ताब्यातील रोलर चालवत होता. त्याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात रोलरसोबत असलेले रमेश कोकरे (वय ३२) यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी संतोष दिलीप होजगे (पोलीस हवालदार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) आणि २८१ अन्वये पुढील तपास सुरू आहे.


















