न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- दुकानातील वस्तूंच्या विक्रीशी संबंधित जीएसटीची रक्कम शासनाकडे जमा न करता स्वतःकडे ठेवून व्यापाऱ्याची तब्बल ३४ लाख ९६ हजार ९६३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजा ओमप्रकाश गोधवाणी (वय ४६, रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जब्बार शयफुद्दीन पटेल (वय ३२, रा. थेरगाव) आणि मकरंद अनिल घेवारी (वय ४०, रा. भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२० ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आंबेडकर चौकातील डी.सी. चेंबरमधील दुकान क्रमांक १ आणि २ येथे ‘न्यू अशोक मोटर पार्ट्स’ या नावाने व्यवसाय सुरू होता. या दुकानातील अकाउंटिंग आणि जीएसटी भरण्याची जबाबदारी आरोपी जब्बार पटेल याच्याकडे होती.
आरोपी जब्बार पटेल याने स्वतःच्या ‘सेव्हन स्टार इंडस्ट्रियल सप्लायर्स’ या फर्मची तसेच मकरंद घेवारी यांच्या ‘मातोश्री इंजिनिअरिंग वर्क्स’ या फर्मची जीएसटीची रक्कम शासनाकडे जमा केली नाही, असा आरोप आहे. दोन्ही फर्मच्या माध्यमातून जमा होणारी जीएसटीची रक्कम स्वतःकडे ठेवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यामध्ये मातोश्री इंजिनिअरिंग वर्क्सशी संबंधित ९ लाख २७ हजार १६२ रुपये, तर सेव्हन स्टार इंडस्ट्रियल सप्लायर्सशी संबंधित २५ लाख ६९ हजार ७९४ रुपयांची रक्कम असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण ३४ लाख ९६ हजार ९५६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडे करीत आहेत.


















