- महिन्याला २.५ टक्के परताव्याचे आमिष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दरमहा २.५ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नितीन निवृत्ती आढळराव (वय ४२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित भालचंद्र ठाकरे (वय ४५, रा. पाषाण) आणि अमित गिरीष नारखेडे (वय ३५, रा. बालेवाडी, सध्या रा. रावेत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी २०२१ पासून ते २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दरमहा २.५ टक्के परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपींकडे ३५ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले.
फेब्रुवारी २०२४ नंतर आरोपींनी नफा देणे बंद केले. त्यामुळे फिर्यादी यांनी गुंतवलेली मूळ रक्कम परत मागितली. त्यावेळी आरोपींनी केवळ २ लाख ७० हजार रुपये परत केले. उर्वरित ३२ लाख ३० हजार रुपये परत न करता, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने घेतलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


















