- ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीने रायडर्सचे स्वागत; १०० स्थानिक रायडर्सचा सहभाग
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ ऑक्टोबर २०२६) :- राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश देत दक्षिण भारतातून सुरू झालेल्या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत उत्साहात स्वागत करण्यात आले. रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जल्लोषाच्या वातावरणात विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सचे स्वागत करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता, बंधुभाव आणि नशामुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात रायडर्सचे स्वागत करण्यात आले. विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या वतीने पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते बाईक रायडर्सना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तब्बल १०० बाईक रायडर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राष्ट्रीय एकता आणि नशामुक्त भारताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला युवकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्यासह अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
दक्षिण भारतातून सुरू झालेली ही राष्ट्रीय एकता बाईक रॅली देशाच्या विविध भागांतून प्रवास करत असून, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील एकतानगर येथे पोहोचणार आहे.
देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे, बंधुभावाची भावना वाढविणे तसेच युवा पिढीमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, हा या रॅलीचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. यावेळी ‘अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!’ हा संदेश देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व रायडर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

















