- अनुराधा पौडवाल यांच्या गीतांनी हजारो रसिक मंत्रमुग्ध..
- अनुप मोरे फाऊंडेशनतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी सात लाखांची मदत जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर स्वरांनी निगडी प्राधिकरणातील दिवाळी पहाट अविस्मरणीय ठरली. हिंदी-मराठी चित्रपटगीते आणि लोकप्रिय भक्तिगीतांच्या सुरेल मैफलीत सुमारे सात हजार रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘तुने मुझे बुलाया शेरावालिये…’, ‘मी आले निघाले…’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’, ‘काळ्या मातीत मातीत…’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
अनुप मोरे सोशल व स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (ता. ७) या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर तथा विद्यमान ज्येष्ठ नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलनानंतर अनुराधा पौडवाल यांनी गायत्री मंत्राचे सादरीकरण करून संगीत मैफलीला मंगलमय सुरुवात केली.
त्यानंतर ‘तुने मुझे बुलाया शेरावालिये…’ या लोकप्रिय भक्तिगीताने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. एकापाठोपाठ सादर झालेल्या भक्तिगीतांमुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना…’, ‘ये मोह-मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे…’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी गीतांनी रसिकांना जुन्या आठवणींत रमवले. मराठी गीतांनाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. ‘या रावजी, बसा भाऊजी…’ या गीताला रसिकांनी वन्स मोअरची मागणी केली.
पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरू झालेली ही संगीत मैफल साडेनऊ वाजता उत्साहात संपन्न झाली. दिवाळीच्या मंगलमय पहाटे अनुराधा पौडवाल यांच्या लोकप्रिय गीतांचा आनंद घेण्याची संधी मिळाल्याने रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरला. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत अनुप अविनाश मोरे व अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीसाठी सात लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
यावेळी विधान परिषद आमदार उमाताई खापरे, उपमहापौर सौ.शर्मिला बाबर कार्यक्रमाचे संयोजक माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे, भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय जनता माथाडी युनियनचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे, समीर मोरे, सलीम शिकलगार, मनोज देशमुख, अतुल इनामदार, अरुण थोरात, विजय शिनकर , सचिन कुलकर्णी, समीर जवळकर आदी उपस्थित होते.

















