न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सत्ताधारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे करण्यास अप्रत्यक्ष सहाय्य केले असून त्यांच्या मजबुरीचा फायदा लाटण्याचा प्रकार शहरात सातत्याने घडत आहे.
शहरातील नागरिकांचा अतिसंवेदनशील प्रश्न म्हणजेच शास्तीकर. हा शास्तीकर लवकरात लवकर संपूर्णपणे माफ करावा याकरीता चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे.
यात पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकाम शास्तीचे गाजर सत्ताधारी भाजपाने दाखविले. आता प्रशासनाने थकबाकीसह मिळकत कर भरल्यास दंडात सवलत देण्यात येणार आहे. म्हणजेच शास्तीकर रद्द होणार नाही का?. पिंपरी चिंचवडकरांनी शास्तीकर भरलाच नाही तर महापालिका काय करणार? शास्तीकर हा झिजिया कर लावून जनतेची लूट भाजप शासन महापालिकेच्या नजरेतून करीत आहे का?
सत्ताधाऱ्यांनी पिंपरी चिंचवडकरांची शास्तीकराबाबत फसवणूक थांबवावी. ”लांडगा आला रे, आला” या उक्तीप्रमाणे सत्ताधारी पिंपरी चिंचवडकरांना भूलथापा देऊन शास्तीकर माफ करू असे म्हणतात. महापालिकेत सत्ताधारी भाजपाने शास्तीकर माफ झाल्यामुळे पेढे वाटले होते. गुलाल आणि हळद उधळली होती. फ्लेक्स ही लावले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. थकित मिळकत कर वसूल व्हावा म्हणून महापालिकेने दोन टक्के दंडाच्या रक्कमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे.
मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना दंडात पंच्याहत्तर टक्के सवलत दिली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात व देशात व महापालिकेत आल्यापासून अवैध बांधकाम शास्तीकराबाबत अनेकदा निर्णय झाले, असे जाहीर करण्यात आले. चक्क जनतेची फसवणूक शासनाने केली आहे. आॅनलाईन अर्ज करून शास्तीकर माफ करता येतो का? पिंपरी चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफ झालाच पाहिजे त्यासाठी आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत शास्तीकर रद्द करण्याचा ठराव महापालिकेत आणला पाहिजे, अशी मागणी चिंचवड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने केली आहे.
पिंपरी चिंचवडकरांची गाजर दाखवून दिशा भूल करू नका? महापालिकेने जनतेच्या हितासाठी शास्तीकराचा सर्जिकल स्ट्राईक करावा. सिताराम कुंठे समितीचा अहवालच महापालिकेने स्विकारला पाहिजे. शास्तीकर रद्द झाला नाही, तर जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बेकायदेशीर बांधकामे व शास्तीकराबाबतचा आणलेला सिताराम कुंठे समितीचा अहवाल योग्य आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, असे चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष, संदेश नवले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.











