न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिंचवड येथे नियोजित अयोध्या श्रीराम मंदिर देखावा व साडेतीन शक्तीपीठे दर्शन सोहळा उत्स्फुर्तपणे साजरा होत असताना, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण प्रक्रिया १५२८ पासून ते आजपर्यंतची माहिती श्रीराम भक्तासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
श्रीराम मंदिर निर्माण चळवळीमध्ये मुख्य भुमिका पार पाडणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, विश्वहिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल व हुतात्मा कोठारी बंधू यांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, अयोध्या श्रीराम मंदिर निर्माणासाठी ज्यांचे महत्वाचे योगदान आहे, त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे नवरात्र महोत्सवात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी शिवसेना भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
विश्वहिंदू परिषदेचे मा. अशोकजी सिंघल स्मृती व्यासपीठ उभारण्यात आले आहे व कारसेवेमध्ये हौतात्म्य प्राप्त कोठारी बंधू यांचा स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे. अयोध्या श्रीराम मंदिर संकल्प पूर्तीसाठी सूर्योदय ते सूर्यास्त “श्रीराम नाम जपास” उत्स्फुर्तपणे श्रीरामभक्त सहभागी होत आहेत. त्याबद्दल श्रीराम भक्तांचे आभार व्यक्त केले.
शिक्षण महर्षी मा.वा. ना. अभ्यंकर यांनी या नवरात्र महोत्सवाच्या परिसरात आल्यानंतर हे प्रसन्न भक्तीमय वातावरण पाहून निश्चितच पुढील पिढीस संस्कारमय आदर्श घडण्यास प्रभू श्रीराम यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल असे सांगितले .
पश्चिम महाराष्ट्र धर्मजागरणचे प्रमुख हेमंत हरहरे यांनी श्रीराम जन्मभूमी निर्माण चळवळीतील पिंपरी चिंचवड मधील घडलेल्या तत्कालीन घटना व इतिहास सर्वांसमोर मांडला, तसेच लवकरच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी नवरात्र महोत्सवास आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.
युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अयोध्येतील भव्य श्रीराम मंदीर उभारणीच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ नवरात्र महोत्सवात देखाव्याच्या रूपाने आमचे शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसेना नगरसेविका यांनी चिंचवड येथे रोवली आहे. निश्चितच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले स्वप्न लवकरच पूर्ण होईल, त्यासाठी शिवसेना आग्रही राहील, असे सांगितले.
याप्रसंगी श्रीराम मंदिर निर्माण चळवळ, शिलान्यास, कारसेवा यामध्ये सहभागी झालेले पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, धर्म जागरण यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चिंचवडकर याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.










