न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव :- तळेगांव नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने शहरातील टपरी पथारी हातगाडी धारकांवर अतिक्रमण कारवाई सुरू आहे. या कारवाईच्या विरोधात टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्यावतीने तळेगांव नगरपालिकेवर शुक्रवार दिनांक १२ ऑक्टो. रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.
तळेगांव स्टेशन येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ वाजता आंदोलनकर्ते प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत नगरपालिकेवर दाखल झाले. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडवला त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जागीच ठिय्या मांडला.
टपरी, पथरी, हातगाडी पंचायत अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात नगरसेवक अरुण माने, मावळ तालुका अध्यक्ष किरण साळवे, सचिव प्रल्हाद कांबळे, जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, अरविंद गायकवाड, तेजस साळवे, अतुल पाटील, महिंद्र साळवे, अभय यलवंडे, विनायक मेटे, संगीत गायकवाड, मीनाक्षी साळवे, संगीत साळवे, अपर्णा पाटील आदी उपस्थित होते.
फेरीवाला धोरणाची अमलबजावणी झालीच पाहिजे, तळेगावातील सर्व टपरी पथारी हातगाडी सर्व्हे झालाच पाहिजे, पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये, अतिक्रमण कारवाई थांबलीच पाहिजे या सह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
अतिक्रमण कारवाई न थांबल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी बाबा कांबळे यांनी दिला. गोर-गरीबावर कारवाई करणाऱ्या प्रशासनाने धन-धांडग्यांना मात्र अभय दिले आहे. प्रशासन अनधिकृत हॉस्पिटल व मोठया बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करत नाही असे मत नगरसेवक अरुण माने यांनी यावेळी व्यक्त केले तर गोरगरीब फेरीवाल्यांवर होणारी कारवाई त्वरित थांबवावी असे किरण साळवे म्हणाले.