न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव :- चिंचवड नवरात्र महोत्सव आयोजित “ब्रह्मनाद मृदंगाचा – सामुहिक मृदंगवादन” या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सामुहिक मृदंग वादनाच्या या भव्य नाद यज्ञात तब्बल १०८ पखवाज वादकांनी आपली वादनरुपी समिधा अर्पण केली. यामध्ये १० वर्षाच्या मुलांपासून ते ६० वर्षाच्या वृद्धांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सामुहिक मृदंग वादनात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. या मृदंग वादनाच्या ब्रह्मनादाने उपस्थित रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. उपस्थित प्रेक्षकांना शुटींगचा मोह मात्र आवरता आला नाही.
शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आणि नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांनी चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत या अनोख्या नाद यज्ञाचे आयोजन केले होते. यावेळी पिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार यांचा संतमेळा घेण्यात आला. यामध्ये ह. भ. प. मंगलाताई कांबळे, ह. भ. प. किसन महाराज हुलावळे, ह.भ.प. बोरकर महाराज शास्त्री, ह.भ.प. यतिराज महाराज लोहार यांचा शिवसेना संपर्क नेते बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, पिं. चिं.नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानदेव बोरुडे, अरुण बोनकर, अमर रोकडे, ह.भ.प. उद्धव महाराज कोळपकर, किसन महाराज चौधरी, रामलिंग महाराज मोहिते, बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय भोंडवे यांनी मोलाचे योगदान दिले.
अशा पद्धतीने प्रवचनकार, कीर्तनकार, वारकरी बांधवाचा संतमेळा आणि “ब्रम्हनाद मृदंगाचा-सामुहिक मृदंगवादन” हा ऐतिहासिक व सर्वांच्या स्मरणात राहील असा कार्यक्रम उत्साहाने पार पडला.