न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींना लावलेला जाचक शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अध्यादेश महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये नगरसेवक कुटे यांनी म्हटले आहे की, पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफीच्या निर्णयामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारकडून महापालिकेला प्राप्त झाला आहे, परंतु महापालिकेने त्याची अद्यापही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी आपला मूळ मिळकत कर भरला नाही. परिणामी, महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
त्यासाठी राज्य सरकराच्या अध्यादेशाची महापालिकेने त्वरित अंमलबजावणी सुरु करावी. महासभेची मान्यता न घेता अध्यादेशानुसार कराची आकारणी करावी. त्यामुळे महापालिकेच्या मिळकतकरावरील ९० टक्के सूट योजनेचा फायदा सामान्य नागरिकांना घेता येईल. तसेच थकित मिळकत कर जमा होण्यास मदत होईल.
त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्या नागरिकांनी शास्तीकर भरला आहे. त्या नागरिकांची शास्तीकराची रक्कम परत करावी. अथवा ती रक्कम त्यांच्या मूळ मिळकत करामध्ये वर्गीकृत करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, अशी मागणी नगरसेवक कुटे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.