न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तसेच पदाधिकारी यांची बैठक सोमवारी दि. १५ रोजी चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे पार पडली. पीएमपीएमएलशी संबंधित प्रश्नांवर पदाधिकारी, अधिका-यांनी यावेळी चर्चा केली.
बैठकीस महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, नगरसेवक कैलास बारणे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
पीएमपीएमएलचे १७८ कर्मचारी महापालिकेकडे कार्यरत होते. मात्र, पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या मागणीनंतर या कर्मचा-यांना पीएमपीएमएलकडे वर्ग केले. वर्ग केलेले कर्मचारी शहरातील रहिवाशी आहेत. त्यांना पुण्यात लांब पल्याच्या बसमार्गावर काम दिले जाते. त्यामुळे त्यांची राहत्या घरापासून जवळ असलेल्या परिसरातील डेपोत बदली करण्यात यावी.
शहरात बसेसची संख्या वाढविण्यात यावी. बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करावेत. नवीन मार्ग सुरू करावेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, देखभाल दुरूस्तीबाबत सक्षम यंत्रणा उभी करावी. डेपो सीएनजी व्यवस्थेसह अद्ययावत करावा. पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुजाभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशा मागण्या नगरसेवकांनी बैठकीत केल्या.
शहरातील कर्मचा-यांच्या अडचणी सोडविल्या जातील. बसेसच्या फे-या वाढविण्यात येतील. लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अध्यक्षा नयना गुंडे यावेळी म्हणाल्या.