न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- ” दसरा” सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व. दोन दिवसांपूर्वी झेंडूच्या फुलांना १०० रुपये किलोच्या पुढे भाव होता. फुलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. पिंपरी चिंचवड शहराच्या प्रमुख चौकांमध्ये फुल विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी फुलविक्रेत्यांनी स्वच्छतेचे नियम ध्याब्यावर बसवून फुलांची विक्री केली.
चिंचवड गावात तर १५० रुपये किलोनी काही विक्रेत्यांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच खंडनवमीस फुलांची विक्री केली. मुद्दल आणि नफा प्राप्त झाल्यानंतर उरलेली फुले रस्त्यावरच टाकून देण्याचा असंस्कृतपणा विक्रेत्यांनी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची नासाडी रस्त्यावरच दिसून आली. अश्या पद्धतीने फुल शेतीमालाची फक्त नफ्यावरच लक्ष केंद्रित करून विक्री करणे म्हणजे असंस्कृतपणाचेच लक्षण नव्हे काय? असे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत होता.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी तात्काळ चिंचवडगाव येथे जाऊन काही फुलविक्रेत्यांना याबाबत समज दिली.
याबाबत समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “आपले शहर आपण स्वच्छ ठेवले पाहिजे हे सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे. फुल विक्रेत्यांनी अश्या पद्धतीने फुले रस्त्यावर टाकून देणे म्हणजे असभ्य पणाचे प्रदर्शन केल्यासारखे आहे. अश्या पद्धतीने प्रमुख चौकांमध्ये फुले अस्ताव्यस्त टाकून निघून गेल्यामुळे पालिका कर्माचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अश्या विक्रेत्यांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे जरुरी वाटते.”


















