न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- अभय योजनेबाबतची माहिती देताना माहिती अतिरिक्त आयुक्त व कर संकलन विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांनी सांगितले कि, मिळकत कर थकबाकी दारांकरिता करसंकलन विभागामार्फत दिनांक १ ऑक्टोबर २०१८ पासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कममध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात येत आहे.
१५ ऑक्टोबर २०१८ पूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा करणा-या मिळकतधारकांकरिता एकूण मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेच्या ९० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. १५ ऑक्टोबर २०१८ पूर्वी एकूण ५२१३ मिळकतधारकांनी २१.३७ कोटीचा भरणा केला असून त्यापैकी ४१६३ मिळकतधारकांना मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये ५ कोटी ४७ लाख इतकी सवलत देण्यात आलेली आहे.
१६ ऑक्टोबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ याकालावधीत मिळकत कराचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या मिळकत धारकांना मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेच्या ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मिळकतकराचा ऑनलाईन पद्धतीने एक रक्कमी भरणा करणा-या मिळकत धारकांकरिता सामान्य करात २ टक्के सुट लागू आहे.
अद्यापही ज्या मिळकतधारकांनी मिळकत कर भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराची रक्कम भरणा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन दिलीप गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.












