न्यूज पीसीएमसी नेटवर्क
अमरावती : सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील एका दुर्गम गावाला भेट दिली आणि गावातल्याच एका घरात दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास या विषयांवर रचनात्मक कार्य करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी या दुर्गम भागातील केन्द्राला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली. हे केंद्र चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे.
राज ठाकरे यांच्या चिलाटी भेटीचं वैशिष्ट्य हे की, आजवर या गावात रस्त्याद्वारे येऊन कोणाही मोठ्या नेत्याने वा मंत्र्याने एकदाही भेट दिलेली नाही. चिखलदरापासून या गावापर्यंत जाणारा रस्ता हा कच्चा, दगडधोंड्यांचा असल्यामुळे चिलाटी आणि त्याच्या आजुबाजुच्या गावात इथल्या पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा येत नाही.
इथला स्थानिक आमदारही निवडून आल्यानंतर गेल्या चार वर्षात गावात एकदाही फिरकलेला नाही. त्यामुळे विविध विकासकामांसाठी लाखो रूपयांचा निधी संमत होऊनही चिलाटी आजही जगापासुन तुटलेले आहे. मात्र राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीमुळे उशीरा का होईना, पण चिलाटीला बाहेरच्या जगाशी जोडणारी विकासवाट निर्माण होईल, असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला.
चिलाटीपासून चार किमी अंतरावरील रुईपठार गावातील नारायण छोटे सेलूकर यांच्या घरी राज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुपारचे जेवण घेतले. सेलूकर कुटुंबातील महिलांनी मक्याची भाकर, राजगिरा पाल्याची भाजी, मसूर आमटी, कुठकी म्हणजे स्थानिक लाल भात आणि गोली या गोड्या पाण्यातील माशाचे कालवण असा जेवणाचा बेत आखला होता.
“राज ठाकरे यांनी आमच्या गावाला आणि घराला भेट दिल्यामुळे खूप आनंद झाला”, अशा शब्दात सेलूकर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.