न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवडमधील दळवीनगर झोपडपट्टी परिसरात सिलेंडर चा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. आगीच्या लपट्याने येथील पाच कुटुंबांचा संसार खाक केला. या दुर्घटनेत जीवितहानी होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. परिसरातील नागरिक अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
नगरसेवक शैलेश मोरे यांनी तातडीने या परिसराचा धावता दौरा केला व आगीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या व संसार उध्वस्त झालेल्या कुटुंबास भेट दिली. या भेटीदरम्यान नागरिकांचा आक्रोश पाहण्या सारखा होता. ऐन सणासुदीच्या काळात या घटनेने काहूर माजवला असून, काबाडकष्ट करून उभा केलेला संसार, कपडेलत्ते, पैसा अडका या सर्व गोष्टींची आगीने क्षणार्धात माती केली होती.
आगीत नुकसान झालेली गोरगरीब व आर्थिक विवंचनाग्रस्त या कुटुंबाने आपल्या जिवाभावाचा लोकप्रतिनिधी आपली विचारपूस करण्यास आल्याचे पाहून, त्यांच्यासमोरच हुंदके देऊन आपला आक्रोश प्रकट करून लागली. त्यांच्या वेदनेने नगरसेवक शैलेश मोरे यांचाही कंठ दाटून आला. दुर्घटनाग्रस्त नागरिक डोळ्यात पाणी घेऊन झालेली घटना सांगत होते. यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांनी या पीडित नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांचे सांत्वन केले.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांनी अपघातग्रस्त कुटुंब व परिसरातील नागरिकांना स्वखर्चाने भोजन दिले व अपघातग्रस्त पाच कुटुंबियांना नव्याने घरकुल बांधून देणार तसेच अन्नधान्य व इतर वस्तुरूपी मदतही करणार असल्याचे सांगितले.
आपला हक्काचा माणूस आपले सांत्वन करून पुन्हा एकदा संकटाचा सामना करण्यास उभारी देत असल्याचे पाहून, उपस्थितांना आनंदाश्रू आवरत नव्हते असे, नगरसेवक शैलेश मोरे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.










