न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी मतदार संघात शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी राजकीय वरदहस्ताने उखळ पांढरे करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात यावी, असे निवेदन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले होते.
महापालिकेने दिलेल्या नोटीसीबरोबर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्रांची झेरॉक्सप्रत जोडून संबंधितांना वाटण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. यावर आयुक्त सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्यागत वागत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रशासन कुणाचेही पत्र कुणालाही वाटत नाही. बाहेरच्या माणसांनी पत्रके वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून पत्रक वाटले गेले असेल तर, त्याची निश्चित खबरदारी घेतली जाईल. अधिका-याकडून अशी चूक झाली असेल तर, ती चुकीचीच बाब आहे. त्याची चौकशी केली जाईल.
यावर खुलासा करताना आयुक्त म्हणाले की, कोणत्याही नगरसेवकाने, पदाधिकारी, आमदाराने, खासदाराने पत्र दिल्यास त्याचे नाव सांगू नये असे मी वेळोवेळी सांगितले आहे. त्या पत्राचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. अतिक्रमण काढणे, अनधिकृत बांधकाम तोडणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, आयुक्तांच्या निर्देशानुसारच सर्व कारवाया होत असतात. हे मी वारंवार कर्मचा-यांना सांगितले आहे. असे सांगूनही कुठला कर्मचारी, अधिकारी चुकीचे काम करत असेल. तर, त्याचा शोध घेण्यात येईल. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल’ असेही हर्डीकर म्हणाले.
अतिक्रमण कारवाईत कोणताही भेदभाव केला नाही. प्रशासन टप्पाटप्प्याने कारवाई करत आहे. नाशिक फाटा, लांडेवाडीतील अतिक्रमणावर कारवाई केली आहे. ही कारवाई निरंतर चालू राहणार आहे. १५ ऑक्टोबरपासून कारवाई सुरु न झाल्यास निलंबनाची कारवाई करु, असा इशारा अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांना दिल्या होता. अल्टीमेटम दिल्यानंतरच ही कारवाई झाली असल्याचे आयुक्त यांनी स्पष्ट केले.










