न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- नाशिक फाटा ते वाकड दरम्यान नागरिकांसाठी जलद वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला बीआरटीएस रस्ता वाहनांच्या अतिवेगामुळे पादचार्यांच्या मुळावर उठला आहे.
पिंपळे गुरवमधील जवळकर नगर ते काशिद पार्क दरम्यान असलेल्या जवळकर नगर, कल्पतरु चौकात रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात घडत आहेत. परिणामी नागरीकांना कायमचे अपंगत्व, तसेच जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जवळकर नगर, कल्पतरु चौकात ग्रेड सेपरेटर तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील हा महत्त्वाचा बीआरटीएस रस्ता पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथून जातो. या परिसरात नागरिकांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जवळकरनगरकडून काशिद पार्ककडे जाताना जवळकरनगर, कल्पतरु चौकातून शाळकरी मुले, महिला, वृद्ध; तसेच चारचाकी, दुचाकीस्वारांना हा बीआरटीएस रस्ता ओलांडून जावे लागते.
या ठिकाणी सिग्नल आहे. मात्र, अनेक वाहनचालक सिग्नलकडे लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात सुदर्शनगर चौक ते जवळकरनगर, कल्पतरु चौकादरम्यान राहुल जाधव हे तीन लहान मुलांसह दुचाकीवरून चौक पार करीत होते. दरम्यान, पिंपळे सौदागरकडून भरधाव वेगात येणार्या मर्सिडिज बेंझ गाडीने त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिल्याने राहुल जाधव यांना जीव गमवावा लागला, तसेच तीन लहान मुले या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या वर्षभरात अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागील वाहने एकावर एक आदळल्याचीही उदाहरणे आहेत. अनेक वाहनचालक सिग्नल असूनही बेदरकारपणे वाहने दामटताना दिसतात. या चौकात अनेक अपघात घडत असूनही महापालिका प्रशासन गंभीर नसलेले दिसते. या चौकातील सिग्नल अनेकदा बंद अवस्थेतच असतात. तर वाहतूक पोलिसाचा पत्ताच नसतो.
ज्यांची नेमणूक केलेली आहे, असे वाहतूक पोलीस बाजूला पावत्या फाडत उभे असल्याचे चित्र असते. त्यामुळे वाहतूक पोलिस असून नसल्यासारखे आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढती रहदारी लक्षात घेता जवळकर नगर, कल्पतरु चौकात ग्रेड सेपरेटरची अत्यंत आवश्यकता आहे. शाळकरी मुलांना तर जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या चौकात ग्रेड सेपरेटर तयार करण्यात यावा, अन्यथा भविष्यात नागरीकांना रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, अशी मागणी माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर यांनी केली.










